कोरोनावर आता नव्या ‘कॉकटेल’ डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनावर आता नवीन कॉकटेल उपचार पद्धती भारतात उपलब्ध होणार आहे. Casirivimab आणि Imdevimab या अँटिबॉडिजचं कॉकटेल करून हे कॉकटेल इंजेक्शन तयार करण्यात येतं. या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत तब्बल ५९ हजार ७५० रुपये आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता.

रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स बनवली आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० इतकी आहे”
सध्या भारतात या कॉकटेल इंजेक्शनची पहिली बॅच दाखल झाली असून दुसरी बॅच जून महिन्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिप्ला कंपनीकडून हे कॉकटेल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या दोन्ही बॅचमुळे जवळपास २ लाख रुग्णांवर उपचार करता येणं शक्य होणार आहे, असं सिप्ला कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे कॉकटेल इंजेक्शन कोणत्या रुग्णांवर वापरता येणार, याविषयी देखील रॉश इंडियाकडून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. याचे डोस सौम्य किंवा मध्यम प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना देता येऊ शकतील. १२ वर्षे वयापेक्षा जास्त असणाऱ्या रुग्णांनाच हे डोस देता येतील. त्यासोबत हे डोस देण्यासाठी रुग्णाचं किमान वजन ४० किलो असणं आवश्यक आहे. ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे, अशा रुग्णांना हे इंजेक्शन देता येईल. मात्र, इंजेक्शन देण्यासाठी रुग्ण ऑक्सिजनवर नसावा, असं देखील कंपनीकडून नमूद करण्यात आलं आहे.

हाय रिस्क रुग्णांना वेळीच हे इंजेक्शन दिल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता कमी होत असून अशा रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण देखील ७० टक्क्यांनी कमी होत असल्याचं दिसून आलं आहे,

 

Protected Content