जळगाव, प्रतिनिधी | शहरातील तहसिल कार्यालय परिसरातील उत्तम झुणका भाकर केंद्राची ताडपत्री तसेच काही वेंडरांच्या खुर्च्या आणि टेबल अज्ञात माथेफिरूने शुक्रवारी मध्यरात्री जाळल्याची घटना उघडकीस आली आहे़. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़.
अधिक माहिती अशी की, कैलास लक्ष्मण चौधरी हा आई मंगला यांच्यासह तहसिल कार्यालय परिसरात वास्तव्यास असून त्यांचे तेथेच ‘उत्तम झुणका केंद्र’ आहे. शुक्रवारी रात्री १२.०० वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने त्यांच्या झुणका भाकर केंद्रावरील ताडपत्री जाळली़ सोबतच बाजूला वेंडर विशाल उगवते व राजेंद्र बारी यांच्या खुर्च्या, टेबल व ताडपत्रीही जाळून तो पसार झाला़. आग लागल्यामुळे मोठा धूर होताच जवळच असलेल्या एका सुरक्षारक्षकास आग लागल्याचे दिसून आले़. त्याने त्वरित कैलास यास उठवून आगीबाबत माहिती दिली़. नंतर कैलास याने आईच्या मदतीने आग विझविली़. सोबतच ज्या वेंडर बांधवांच्या खुर्च्या आणि टेबल जळाले होते त्यांनाही माहिती दिली़. याप्रकारात सगळ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी मंगला चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़.