वॉशिंग्टन वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्तावास हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या मुद्द्यावर बुधवारी तब्बल १० तास चर्चा करण्यात आली. २३० विरूद्ध १९७ मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याविरोधातील दुसरा प्रस्तावही सभागृहात मंजूर करण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत संभाव्य प्रतिद्वंदी जो बिदेन यांना हानी पोहोचवण्यासाठी युक्रेनमधून मदत घेतली आणि त्या बदल्यात त्या देशाला अमेरिकेकडून वेगळ्या स्वरूपात मदत दिली. या मुळे अमेरिकेची प्रतिमा मलीन झाली. याला जबाबदार ट्रम्प आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र, सध्यातरी डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आबाधित राहील असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. याचे कारण म्हणजे, हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सीनेटमध्ये महाभियोग मंजूर होणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे. जर कमित कमी २० रिपब्लिकन सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बंड पुकारले तरच ट्रम्प सत्तेपासून दूर हटू शकतात. मात्र, असे होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे. उलट या महाभियोग प्रस्तावामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये एकजूटच होईल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.