जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगरातील गौरव पार्क येथे राहणारे ४७ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेतला. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २७ जून रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिनेश धर्मा ठाकूर वय ४७ रा. गौरव पार्क, खोटे नगर, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश ठाकूर हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह खोटे नगर परिसरात गौरव पार्क येथे वास्तव्याला होते. मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून ते नोकरीला होते. गुरूवार २७ जून रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांची पत्नी व मुलगा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारचांच्या मदतीने तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी २८ जून रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी रंजना, मुलगा भूषण, मुलगी वैष्णवी आणि दोन बहिणी असा परिवार आहे.