जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पितळी तांब्यासह सोन्या-चांदीचे दागिन्यांना पॉलीश करण्याचा बहाणा करून दोन अज्ञात भामट्यांनी ईश्वर कॉलनीतील ६५ वर्षीय वृध्द महिलेचे १ लाख २५ हजारांचे दागिने हातचालाखीने लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (वय-६५) ह्या दिराणी बायादेवी उदयराज वर्मा यांच्यासोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोन्ही वृध्द महिला घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती आले. आम्ही कंपनीचा सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो असे सांगितले. त्यानंतर वृध्द महिलेने घरातील तांब्या दिला. तो त्यांनी साफ करून दिला. त्यानंतर दागिने देखील साफ करून देतो असे सांगितले. त्यानुसार वृध्द महिलेने सुरूवातील दोन चांदीचे कमरपट्टी दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले. त्यामुळे वृध्द महिलेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळी दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याच्या कानातील रिंगा काढून दिल्या. दोघांनी एका पातेल्यात हळद व लालसर रंगाची पावडर टाकून दागिने गॅस ठेवण्यास सांगितले. त्यानंतर थंड झाल्यावर काढून घ्या असे सांगून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हातचालाखीने चोरून धुम ठोकली. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने बुधवारी ५ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.