Home Cities अमळनेर वृध्दाचे बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला !

वृध्दाचे बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका वृद्ध नागरिकाच्या घरातून बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास सुमारे २ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे सारबेटे खुर्द गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील सारबेटे खुर्द येथील रहिवासी भीमराव पुना पाटील (वय ६४) यांच्या घरात ही चोरीची घटना घडली. बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली.

चोरट्यांनी घरातून दोन सोन्याची चैन, एक सोन्याची माळ, तीन सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याचे टोंगल, सोन्याचे किल्लू आणि सोन्याचे काप असा सोन्याचा ऐवज चोरला. यासोबतच, चांदीचा करदोडा, चांदीच्या वाळ्या, कमरपट्टा, चांदीचे कडे आणि चांदीच्या देवीच्या मूर्त्या यांसारखा चांदीचा ऐवजही लंपास केला. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मिळून एकूण २ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी तत्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत हे करत आहेत.


Protected Content

Play sound