हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस राज्यात वाढताना दिसत आहे. त्यांची एवढी हिंमत वाढली आहे की ते सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्यासही मागेपुढे पाहात नाही. त्यांना कायद्याचा कोणताही धाक राहीलेला नाही. अशीच एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे घडली आहे. इथल्या एका महिला तलाठ्याला वाळू माफीयाने ट्रेक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सुवर्णमाला शिरसाट या तलाठी म्हणून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे काम करतात. सध्या त्यांनी अवैध वाळू विरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत औंढा नागनाथच्या वडद इथे अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याठीकाणी त्या पोहचल्या. त्यांना अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या अंगावर तो ट्रॅक्टर घालण्यात आला.
ट्रॅक्टर अंगावर घालत असताना सुवर्णमाला शिरसाट ह्या बाजूला झाल्या. त्यामुळे त्या बचावल्या. या घटनेनंतर सर्वच जण हादरून गेले. त्यांनी त्यानंतर तात्काळ हिंगोलीचे हट्टा पोलिस स्थानक गाठले. अवैध रित्या वाळूची तस्करी करणाऱ्या तीन वाळू माफीयां विरोधात त्यांनी तक्रारही दिली आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात वाळू माफीयांची दादागिरी वाढत चालली आहे. त्यांना वेळीच पायबंद घालण्याची मागणी होत आहे.