सिंधूदूर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधूदूर्ग जंगलात एका ५० वर्षीय महिला लोखंडी साखळीने बांधलेली आढळून आली आहे. तिच्या हाताला आणि पायात लोखंडी बेड्या होत्या आणि महिलेला मोठ्या झाडाला बांधण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि महिलेची सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेकडून अमेरिकन पासपोर्टची फोटोकॉपी आणि तामिळनाडूचा पत्ता असलेले आधार कार्ड तसेच इतरही काही कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सिंधूदूर्ग जिल्हयातील सोनूर्ली गावात शनिवारी सायंकाळी एका मेंढपाळाला महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला धक्काच बसला. महिलेची प्रकृती चांगली नसल्याने तिला साखळीच्या सहाय्याने झाडाला बांधण्यात आले होते. यानंतर मेंढपाळाने स्थानिक पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, महिलेची जंगलातून सुटका केल्यानंतर तिला प्रथम सावंतवाडी रुग्णालयात आणि नंतर ओरोस येथे दाखल करण्यात आले. त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती लक्षात घेऊन त्यांना चांगल्या उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, महिलेला मानसिक समस्या असल्याचा अंदाज आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महिलेकडे तामिळनाडूचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि यूएस पासपोर्टची छायाप्रत सापडली आहे. त्यानुसार ललिता काई या नावाने तिची ओळख पटली आहे. तिच्या व्हिसाची मुदत संपली आहे. पोलिस या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत, जेणेकरुन याची खात्री करता येईल. महिलेचे राष्ट्रीयत्व, प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी देखील संपर्क साधण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही महिला गेल्या 10 वर्षांपासून भारतात राहत होती. ती सध्या कोणतेही वक्तव्य करण्याच्या स्थितीत नाही. अनेक दिवसांची भूक आणि तहान यामुळे ती अशक्त झाली आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तिला किती दिवसांपूर्वी झाडाला बांधून ठेवले होते? का बांधून सोडले होते? याची चौकशी करण्यात येत आहे. तामिळनाडूत राहणारा तिचा नवरा तिला जंगलात बांधून पळून गेल्याचा संशय आहे. पोलिस तामिळनाडू, गोवा आणि इतर ठिकाणी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.