जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी शिवारात असलेल्या पडक्या विहिरीत ४५ वर्षीय प्रौढाने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नंदलाल सुरेश गोसावी (वय-45 रा. दिनकर नगर) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदलाल गोसावी हे ट्रॅक्टर चालक असल्यामुळे आई सुशिलाबाई यांना ट्रॅक्टर शोरूमला जाऊन येतो असे शुक्रवार 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घरातून निघाले होते. कुणाला काहीही न सांगता त्यांनी तालुक्यातील खेडी शिवारातील मनुदेवी मंदिराजवळ असलेल्या जनार्दन खडके यांच्या शेतातील पडक्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजून आले नाही. शेतातील मजूर आज सकाळी कामावर आल्यानंतर विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने लक्षात येताच विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलीस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी तातडीने पोलीसांना खबर दिली. एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ४ वाजता मृतदेह विहिरीतून काढण्यात आला.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी सुनंदा, आई सुशिलाबाई, जयेश (१५), कृष्णा (१३) आणि उमेश (वय-१०) असा परिवार आहे.