जळगाव, प्रतिनिधी | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्या वतीने देशभक्तीपर उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘हे मृत्युंजय’ हे दोन अंकी नाटक संपूर्ण देशभर नव्या पिढीला दाखवले जात आहे. ह्या नाटकाचे एकूण ९५ मराठीत तर ५ हिंदीतून प्रयोग झाले आहेत. या प्रेरणादायी नाटकाचा एक प्रयोग उद्या (दि.१८) तर तीन प्रयोग २१ सप्टेंबर रोजी (शनिवार) शहरात तरुणांसाठी नि:शुल्क आयोजित करण्यात आले आहेत.
आजपर्यंत देशभरात सुमारे ४५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना हे नाटक निःशुल्क दाखवण्यात आले आहे. १४ मार्च आणि १३ ऑगस्ट रोजी हे नाटक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंदी भाषेत सादर करण्यात आले होते. तेथे शिवाजी महाराज आणि वीर सावरकर ह्यांचा पुतळाही स्थापन करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी तब्बल ५० वर्षे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती, त्यासाठी त्यांना अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये पाठविले होते. सुमारे ११ वर्षे ते तिथे होते. ह्या कालावधीत त्यांना आणि सर्व क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी अत्यंत अमानुषपणे वागवले होते. प्रत्येक क्षणाक्षणाला त्या सर्वांना मृत्यूला सामोरे जावे लागत होते. अनेकांनी आत्महत्या केल्या, कोणी वेडे झाले, गळफास लावून घेतले तर कोणी स्वतःला व्याधींनी जखडून घेतले.
अशा परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी अंदमानात मृत्यूशी दिलेल्या थरारक झुंजीची गाथा म्हणजेच ‘हे मृत्युंजय’ नाटक आहे. आपणास मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य युवापिढीला कळावे, ह्या एकमेव उद्देशाने हे नाटक जळगावातील ज्युनिअर कॉलेज/डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना निःशुल्क दाखवले जात आहे. उद्या (१८ सप्टेंबर) सायंकाळी ६.३० वाजता एम.जे. कॉलेजच्या मैदानावर शतक महोत्सवी १०० वा प्रयोग खास विद्यार्थ्यांसाठी प्रयोग सादर केला जाणार आहे. तसेच २१ सप्टेंबर सकाळी १०.०० फक्त विद्यार्थिनीसाठी, दुपारी २.०० फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि सायंकाळी ७.०० वाजता सर्व रसिकांसाठी असे तीन प्रयोग छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिरात, सादर करण्यात येणार आहेत.
शहरातील ज्युनिअर कॉलेज आणि डिग्री कॉलेजच्या संस्थांना/प्रिन्सिपॉलना भेटून आणि पत्र देऊन सर्वांच्या सहकार्याने आमचा सर्व युवापिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आयोजक करत आहेत. तरी जळगावकर देशभक्त युवकांनी या नाटकाला आवर्जून उपस्थित राहून सावरकरांच्या महान कार्याची ओळख करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (इच्छुकांसाठी सावरकर स्मारकाविषयी सर्व माहिती savarkarsmarak.com वर उपलब्ध आहे.)