Home राज्य अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण


अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारच्या महायुतीच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे गती घेत असताना, आज अमरावतीकरांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मुरलीधर मोहोळ, भाजप आमदार रवी राणा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळी १०.३० वाजता अमरावती विमानतळावर झालेल्या या कार्यक्रमात एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचे उड्डाण प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली १०० पोलीस अधिकारी व ३०० कर्मचारी असा एकूण ४०० पोलिसांचा बंदोबस्त होता. यासाठी ३ हजार लोक बसू शकतील असा भव्य मंडपही उभारण्यात आला होता. या ऐतिहासिक दिवशी सकाळी ९ वाजता मुंबईहून पहिले प्रवासी विमान अमरावती विमानतळावर दाखल झाले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. बारा वाजून ३० मिनिटांनी हेच विमान अमरावतीहून पुन्हा मुंबईसाठी रवाना झाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरावतीकरांच्या वर्षानुवर्षांच्या स्वप्नांना आज खऱ्या अर्थाने पंख लाभले आहेत. या संदर्भात भाजप आमदार रवी राणा यांनी माहिती दिली की, “यवतमाळ व अकोला भागातील प्रवासीही आता अमरावती विमानतळाचा लाभ घेऊ शकतील. लवकरच स्टार एअर आणि इंडिगो या कंपन्यांची सेवा येथे सुरू होणार आहे. भविष्यात अमरावती ते दिल्ली आणि पुणे दरम्यानच्या सेवा सुरू व्हाव्यात यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळावे, ही माझी इच्छा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. हा क्षण केवळ अमरावतीसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी अभिमानास्पद ठरला आहे. या नव्या उड्डाणामुळे विकासाचे दरवाजे अधिक वेगाने उघडतील, असा विश्वास जनतेत व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound