मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने नियमानुसार शेतकर्यांना १२ टक्के व्याजासह पिक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केली आहे.
या संदर्भात डॉ. विवेक सोनवणे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये ८१ हजार हेक्टर वर ७८ हजारो केळी उत्पादक शेतकर्यांनी पीक विमा काढला होता. पीक विम्याचा कालावधी ३१ जुलै २०२२ रोजी संपुष्टात आलेला असून १८ जून २०२१ रोजी च्या शासन निर्णयानुसार पिक विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर थंडीचे व अतिउच्च तापमानाचे पैसे तीन आठवड्यांच्या आत म्हणजे २२ ऑगस्ट पर्यंत व गारपीट,चक्रीवादळाचे पैसे ४५ दिवसांच्या आत म्हणजे १५ सप्टेंबर पर्यंत सर्व रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होणे बंधनकारक होते. परंतु नोव्हेंबर महिना उजाडला परंतु शेतकर्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळालेली नसल्यामुळे ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी च्या शासन निर्णयानुसार बाधित शेतकर्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई ही १२ टक्के व्याजाने देणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने राज्य शासनाने शेतकर्यांना ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी च्या शासन निर्णयानुसार विम्याची नुकसान भरपाई ही १२ टक्के व्याजाने न दिल्यास शेतकर्यांचे रक्त शोषणारे केंद्रीय कृषिमंत्री व महाराष्ट्र शासनाचे कृषिमंत्री यांचा रक्ताने अभिषेक करून निषेध करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिला आहे.