Home Cities यावल अमोल जावळेंना डावलले : भाजपच्या शेकडो पदाधिकार्‍यांचे राजीनामे !

अमोल जावळेंना डावलले : भाजपच्या शेकडो पदाधिकार्‍यांचे राजीनामे !

0
50

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना डावलून रक्षा खडसे यांना तिकिट दिल्याने संतप्त झालेल्या शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत रावेरमधून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना पुन्हा तिकिट जाहीर केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे तिकिट कापले जाणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच त्यांनाच पुन्हा तिकिट मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे यामुळे तिकिटाचे प्रबळ दावेदार असणार्‍या विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. यातूनच यावल-रावेरमधील शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे हे त्यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

दरम्यान, राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांमध्ये पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, नारायणबापू चौधरी यांच्यासह शेकडो पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. रात्री उशीरापर्यंत भालोद येथे या पदाधिकार्‍यांनी आपण अमोल जावळे यांच्या सोबत असल्याचे सांगत संतप्त भावना व्यक्त केल्या. तर, या संदर्भात स्वत: अमोल जावळे यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तथापि, या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Protected Content

Play sound