Home मनोरंजन अमिताभ ते रजनीकांत : ‘अवयव दान’ मोहिमेत सेलिब्रिटींचा पुढाकार

अमिताभ ते रजनीकांत : ‘अवयव दान’ मोहिमेत सेलिब्रिटींचा पुढाकार


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । १३ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक अवयव दान दिनानिमित्त संपूर्ण देशात जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. या दिवशी अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित करत, अनेक ठिकाणी परिसंवाद आणि चर्चांचे आयोजन केले जाते. अशातच भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार स्वतः पुढाकार घेत या पुण्यकार्यात सहभागी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश जात असून, अनेकांना प्रेरणाही मिळत आहे.

दक्षिणेतील लोकप्रिय पावरस्टार पुनीत राजकुमार यांच्या २०२१ मध्ये झालेल्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे डोळे दान केले. यामुळे दोन दृष्टिहीन व्यक्तींना नवदृष्टी मिळाली. त्यांच्या चाहत्यांनीदेखील मोठ्या संख्येने अवयव दानाचा संकल्प करत त्यांच्या कार्याला पुढे नेले.

ऐश्वर्या राय बच्चन हिने अनेक वर्षांपूर्वीच आपले डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. तिच्या मते, “माझे डोळे माझी सर्वात मोठी संपत्ती असून, मी त्यांचे दान करून कोणालातरी जग पाहण्याची संधी देऊ शकते.” अमिताभ बच्चन यांनीसुद्धा डोळ्यांसह इतर अवयव दान करण्याची तयारी दर्शवली आहे. ते अनेक वेळा अवयव दानाविषयी जनजागृती करतात आणि लोकांना यामध्ये भाग घेण्याचे आवाहन करतात.

थलाइवा रजनीकांत यांनी अवयव दानाची पराकाष्ठा गाठली असून, त्यांनी संपूर्ण शरीर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते, “मृत्यूनंतरही सेवा सुरू राहिली पाहिजे, आणि अवयव दान ही त्याची सर्वोत्तम पद्धत आहे.”

प्रियंका चोप्रा हिनेही सर्व अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ मध्ये आमिर खान यांनीही मृत्यूनंतर सर्व अवयव दान करण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे, सलमान खान याने अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान करण्याचा संकल्प करत स्टेम सेल दानाविषयी जनजागृती केली आहे.

आर. माधवन यांनी संपूर्ण शरीर दान करण्याचा निर्धार केला आहे, तर कमल हासन यांनी डोळ्यांपासून मूत्रपिंडापर्यंत सर्व अवयव दान करण्याची तयारी दर्शवली आहे. जूही चावला हिनेही डोळे दान करण्याचा निर्णय घेत समाजात आपले योगदान नोंदवले आहे.


Protected Content

Play sound