कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज (दि.13) सकाळी येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. येत्या २१ तारखेला जनतेला महाराष्ट्राचे नवीन सरकार निवडायचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले.
कृषी, दूध, उद्योग, एफडीआय, शिक्षण या क्षेत्रांमध्ये एक क्रमांकावर असलेला महाराष्ट्र १५ वर्षांत कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत १५ क्रमांकाच्याही खाली गेला. पण पाच वर्षांतच फडणवीस सरकारच्या कालखंडात महाराष्ट्र एफडीआयमध्ये एक क्रमांकावर आला. शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर तर कृषी व उद्योग क्षेत्रात पाचव्या क्रमांकावर आणला आहे. आणखी पाच वर्षे द्या, महाराष्ट्र या सर्वच क्षेत्रामध्ये एक नंबरचे राज्य बनवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. राज्यातील काँग्रेस आघाडीच्या काळात भ्रष्टाचार होता. ७० हजार कोटी सिंचन प्रकल्पावर खर्च करूनही पाणी आले नव्हते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने नऊ हजार कोटी खर्च केले व जलयुक्त शिवारातून १८ हजार गावांत पाणी दिले. कोल्हापुरात रस्ते बांधणी करण्यात आली, पण त्यासाठी टोल आकारला जात होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ४५० कोटी देऊन जनतेच्या मानगुटीवर बसणारा टोल रद्द केला. केंद्र व राज्यात एकच सरकार असल्यानेच महाराष्ट्राचा विकास झाला, असे शहा यांनी नमूद केले.