जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांची ३० लाख रुपयांमध्ये फसवणूक केली आहे. या प्रकरणी शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अर्चना पाटील हिच्यासह ७ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला सहाय्य कक्षामध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मंगला सुभाष तायडे (वय-३८, रा. पोलिस लाईन) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना तेथे सोबत असलेल्या अर्चना प्रभाकर पाटील हिच्याशी ओळख व मैत्री झाली. त्यानंतर सन २०२२मध्ये आपल्याकडे नफा मिळवून देणारी सोन्यातील गुंतवणुकीची चांगली योजना असल्याचे अर्चना हिने सांगितले. सराफ व्यावसायिकांचा ग्रुप असून आम्ही दुबई येथून कमी भावात सोने आणून ते येथे सोनारांना जास्त भावात विकतो व त्यातून जास्त नफा मिळतो, असे तिने सांगत तुलादेखील जास्त नफा मिळवून देईल, असे सांगितले.
मंगला तायडे या नफ्याच्या अमिषाला बळी पडल्या व त्यांनी सुरुवातीला ७० हजार रुपये दिले. महिनाभराच्या आत त्यांना ७५ हजार रुपये परत मिळाले. त्यानंतर एक लाख, दीड लाख, दोन लाख अशी वाढवून रक्कम दिली, त्यावरही वाढीव मोबदला अर्चना देत गेली. त्यामुळे तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर मोठ्या गुंतवणुकीचे सांगितल्याने मंगला यांनी एवढे पैसे नसल्याचे सांगितल्याने त्यांना काही मालमत्ता विकून गुंतवणूक करण्याचा सल्ला अर्चनासह तिची आई, बहीण मोनिका सचिन पाटील यांनी दिला. त्यानंतर मनिषा यांनी दोन वेगवेगळ्या बँक खात्यातून नऊ लाख रुपये व वेळोवेळी एकूण रोख ११ लाख रुपये अर्चना पाटील हिला दिले.
मंगला तायडे यांच्यापाठोपाठ जिल्हा विशेष शाखेतील पोलिस शिपाई वैशाली उत्तम गायकवाड (२९) यांनाही अर्चनाने असेच अमिष दाखवत त्यांची १० लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. यामध्ये रोख तीन लाख एक हजार रुपये घेण्यासह अन्य रक्कम युपीआयद्वारे स्वीकारली.
एवढे दिवस होऊनही रक्कम परत मिळत नसल्याने मंगला तायडे यांनी मे २०२४मध्ये अर्चनाकडे पैसे परत मागितले असता लोकसभा व विधानसभा निवडणूक असल्याने पैसे मिळण्यास उशीर लागेल, असे सांगितले. सप्टेंबर २०२४मध्ये मंगला यांच्यासह गुंतवणूक केलेल्या इतर सात ते आठ महिला व पुरुषांची अर्चनाच्या घरी बैठक घेण्यात आली. पैसे मुंबई येथे अडकल्याचे त्यांन सांगण्यात आले.
पैशासाठी सर्वांचाचा तगादा वाढत असल्याने टोलवाटोलवी करण्यासाठी ‘सायलेंट ग्रुप’ तयार केला. त्यातही दुसऱ्याच महिलेला ॲडमिन केले. त्यात सर्वांचे पैसे मिळतील, टेन्शन घेऊ नका, अफवा पसरवू नका, असे मेसेज अर्चना टाकू लागली. नंतर तगादा वाढल्याने ती ग्रुपमधूनही बाहेर पडली.
अर्चना पाटील हिच्याबद्दल तक्रार अर्ज देण्यात आल्यानंतर त्याची चौकशी होऊन तिला निलंबित करण्यात आले व निलंबन काळात मुख्यालयात जमा केले.
या प्रकरणी अखेर मंगला तायडे यांनी ७ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अर्चना पाटील, तिची आई कल्पना पाटील, बहीण मोनिका पाटील, बहिणीचा मुलगा विजय पाटील, मित्र मिरखा नुरखा तडवी, मानसी रवींद्र पाटील, मनिषा चव्हाण या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना पाटील हिला अटक करण्यात आली आहे.