Home Cities जळगाव रुग्णवाहिका चालकांचे सात महिन्यांपासून मानधन थकले !

रुग्णवाहिका चालकांचे सात महिन्यांपासून मानधन थकले !


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र आणि जिल्हा रूग्णालयातील रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांचे गेल्या सात महिन्यांपासून मानधन आणि पगार थकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीत चालकांनी त्यांचे थकीत मानधन तातडीने मिळावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

रुग्णवाहिका चालकांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’शी बोलताना आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. असे असतानाही प्रशासनाकडून गेल्या सात महिन्यांपासून त्यांचे मानधन थकवण्यात आले आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी, त्याचा निकाल कधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे, आता तरी त्यांचे थकीत मानधन आणि पगार नियमित करण्याची मागणी चालकांनी केली आहे.

सात महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने या चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रुग्णवाहिका चालकांचे थकीत मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound