जळगाव प्रतिनिधी । खान्देशचे थोर सुपुत्र विख्यात साहित्यीक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ‘अमर उजाला आकाशदीप शब्द सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे.
अमर उजाला या ख्यातप्राप्त हिंदी दैनिकातर्फे दरवर्षी ‘आकाशदीप शब्द सन्मान’ देण्यात येतो. याला दोन विभागांमध्ये देण्यात येते. यातील हिंदी भाषेसाठी यंदा ज्ञानरंजन हे लेखक व संपादक यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हिंदीतर भाषांमध्ये मराठीतले ख्यातप्राप्त लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना या सन्मानाची घोषणा करण्यात आलेली आहे. पाच लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप असून लवकरच एका कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
यावल तालुक्यातील सांगवी येथील मूळ रहिवासी असणारे भालचंद्र नेमाडे यांनी कोसलाच्या माध्यमातून मराठी साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. यानंतर एकाहून एक सरस कादंबर्या सादर करणारे नेमाडे हे साक्षेपी समीक्षक व अतिशय दर्जेदार कवि म्हणूनही ख्यात आहेत. अलीकडेच हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ या त्यांच्या कादंबरीलाही रसिकांसह समीक्षकांची पसंती मिळाली असून सर्व जण याच्या पुढील भागाची वाट पाहत आहेत. तसेच ज्ञानपीठ, पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून यात आता अमर उजाला आकाशदीप शब्द सन्मानाची भर पडणार आहे.