अमळनेर प्रतिनिधी । संत सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळ्यानिमित्त येथे दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप करून विविध उपक्रम घेण्यात आले.
प्रती पंढरपूर म्हणून नावारूपाला आलेले संत सखाराम महाराज संस्थानला दोनशे वर्षे पुर्ण झाल्याने राज्यातील अनेक भागातील संत व भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्याने बोरी नदीत यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बोरी नदीपात्रात सुरूअसलेल्या सद्गुरू संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवात
महाविष्णु पंचायतन यागात प्रचंड उत्साह आणि भक्ती भावाने चारशेहुन अधिक भाविकांनी पूर्णाहुती कार्यक्रमात सहभागघेतला. शनिवारी या यज्ञाची पूर्णाहुती वाडी संस्थानचे गादीपती प पु संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते सांगता झाली. यात संस्थान चे विश्वस्त व द्विशताब्दी कार्यालयाचे व्यवस्थापक अनिल घासकडबी, मनोज भांडारकर हे उपस्थित होते. गेल्यासहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्री तुकाराम महाराजांच्या गाथेच्या सामुदायिक पारायणात दिवसेंदिवस अधिक वाढ होऊन साडे तीन हजार भाविकांनी गाथा पारायण केले.
दरम्यान, कांताई नेत्रालाय जळगाव यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना संत सखाराम महाराज संस्थान यांच्या तर्फे काळे चष्मे वितरित करण्यात आले. तसेच दिव्यांग साहित्य वाटपाला प्रचंड प्रतिसाद आल्याने वाटप स्वीकारण्यासाठी आलेल्या दिव्यांगांना नियंत्रित करण्यासाठी अनेक स्वयंसेवक कार्यरत होते.ठिकठिकाणाहून आलेल्या दिव्यांग व्यक्ती ना ५० सायकल रिक्षा, ५० कमोड खुर्ची, १० व्हील चेअर्स, १०० आधार काठ्या २५ वाकर्स, व कुबड्या वाटप करण्यात आल्या, दुपारी ४ ते ५ व ५ ते ६ या प्रवचन सत्रात अनुक्रमे नाशिक चे वेदमूर्ती अतुलशास्त्री भगरे, व गिरणात मल्यनाथ महाराज संस्थान यांचे अधिपती श्रद्धेय गुरुबाबा महाराज औसेकर यांचे सुंदर प्रवचन झाले. तर रात्रीच्या कीर्तन सप्ताहात वासकर पिठाचे अधिपती विठ्ठल महाराज यांचे सुश्राव्य कीर्तनदेखील आयोजित करण्यात आले.