अमळनेर प्रतिनिधी । शेजारच्यांनी केलेल्या मारहाणीत आपल्या आईचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मयत महिलेच्या मुलाने केली आहे. यासाठी त्याने आईचा मृतदेह घेऊन थेट पोलीस स्थानक गाठल्याने काही वेळ गोंधळ उडाला.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खेडी येथील उषाबाई मोरचंद पाटील यांचा ४ जानेवारीला सायंकाळी गळफासामुळे मृत्यू झाला होता. यावेळी नातेवाइकांनी उषाबाईची हत्या झाल्याचा आरोप केला. यामुळे मृतदेह जळगावला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तेथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. यानंतर मृतदेह घेऊन गावी न जाता त्यांचा मुलगा सतीश पाटील यांनी थेट अमळनेर पोलिस ठाणे गाठले. वृद्ध महिलेला वारंवार त्रास देणार्या शेजार्यांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा मृतदेह नेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. शेजार्यांनी माझ्या आईला मारहाण केली. तरीही पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत होते असा आरोप त्यांनी केला. डीवायएसपी राकेश जाधव यांनी आप्तांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले. यामुळे अखेर त्या महिलेच्या पार्थिवावर अंत्यासंस्कार करण्यात आले.