रेमडेसिवीरच्या काळ्याबाजारात माजी आ. शिरीष चौधरींचा सहभाग-मलिकांचा आरोप

मुंबई प्रतिनिधी । रेमडेसिवीरच्या काळ्याबाजारात अमळनेरचे माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचा सहभाग असून त्यांची नंदुरबारात या इंजेक्शन्सचा मोठा साठा करून ठेवला असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. आ. अनिल भाईदास पाटील यांनी या प्रकरणी तक्रार केली असून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रेमडेसिवीर इंजेक्शनवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यात आज अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर आरोपांची सरबत्ती केली. यात रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराचे तार हे खान्देशापर्यंत पोहचले असल्याचा आरोप त्यांनी केला.

नवाब मलिक म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आलेला आहे. अमळनेरचे माजी आमदार तथा भाजपचे विधानसभेतील उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांचा यात सहभाग असून त्यांनी हा साठा केलेला आहे. या प्रकरणी अमळनेरचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी तक्रार केली असून नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांना तपास करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शिरीष चौधरी यांनी नंदुरबार, धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातील काही रूग्णांना गैरमार्गाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला असल्याचा धक्कादायक आरोप देखील नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणात चौकशीतून सत्य समोर येणार असल्याचा दावा देखील केला.

Protected Content