अमळनेर प्रतिनिधी । शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेतील टोकन घोटाळ्याप्रकरणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांना निलंबीत करण्यात आले आहे.
गत वर्षी झालेल्या शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेत टोकन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. याच्या अंगर्त नाव नोंदणी केलेल्या शेतकर्यांना वगळून नोंदणी न करणार्या इतर शेतकर्यांना टोकन देण्यात आले होते. त्याच प्रमाणे क्रमवारीत टोकन न देता अनियमितता ठेवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी व काही शेतकर्यांनी केला होता. याबाबत त्यांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार सहाययक निबंधक गुलाबराव पाटील यांनी चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांना अहवाल पाठवला होता. या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधकांनी पाचोरा येथील सहाय्यक निबंधकांना चौकशीसाठी नेमण्यात आले होते. त्या चौकशीत देखील सचिव डॉ.उन्मेष राठोड दोषी आढळले.
महाराष्ट्र पणन अधिनियम १९६७ च्या नियम १०६ प्रमाणे दुय्यम कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सचिवांची होती. मात्र, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हा उपनिबंधकांनी सचिव डॉ.राठोड यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे निर्देश दिल्यानुसार प्रशासक गुलाबराव पाटील शुक्रवारी सचिव उन्मेष राठोड यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे.