अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर ते धरणगाव स्थानकांच्या दरम्यान असणार्या भोणे गावाजवळ आज सकाळी हावडा एक्सप्रेसला रेल्वे मार्गाला लागूनच असणार्या ट्रकने दिलेल्या धडकेत काही प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत असणार्या अमळनेर ते धरणगाव स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळांचे काम सुरू आहे. या अनुषंगाने भोणे गावाजवळ आज सकाळी काम सुरू होते. यातच अमळनेर कडून हावडा एक्सप्रेस आली असता रूळांच्या कामाची सामग्री घेऊन आलेल्या ट्रकने एक्सप्रेसला टक्कर दिली. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. तथापि, मोठा अपघात टळला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळतच प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून क्रेनच्या मदतीने ट्रकला तेथून बाजूला केले आहे. यानंतर हावडा एक्सप्रेस जळगावकडे रवाना झाली आहे.