अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मांडळ येथील तरूणाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून करण्याच्या प्रयत्नातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी या तरूणाचा १७ जानेवारी रोजी त्यांच्या शिवारातील शेतात निर्घृण खून झाला होता. जयवंत कोळी यांनी त्यांच्या शेताजवळ असलेल्या लवकी नाल्यातून वाळू भरू न दिल्याच्या रागातून त्यांच्यावर ट्रॅक्टर चालवून जखमी करण्यात आले. तसेच त्यांच्यावर फावड्याने वार करून खून करण्यात आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मयताची पत्नी शुभांगी कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात अशोक लखा कोळी, विशाल अशोक शिरसाठ (कोळी ); सागर अशोक कोळी, विनोद अशोक कोळी, रोहित उर्फ रोहन बुधा पारधी, गोलू उर्फ नरेश देविदास कोळी आणि ऋषीकेश उर्फ दादू राजेंद्र कोळी यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी सध्या जिल्हा कारागृहात आहेत.
दरम्यान, या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशोक लखा कोळी (रा. मांडळ) हा घटना घडल्यापासून फरार झाला होता. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होता. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे वास्तव्याला होता. या अनुषंगाने पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवून त्याला शिताफीने अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश जाधव, एलसीबीचे निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक खलाणे, उपनिरिक्षक विनोद पाटील, संजय पाटील, सुनील अगोणे, सुनील तेली, अनिल राठोड, उज्वल पाटील, तुषार वाघ व दिनेश पाटील यांच्या पथकाने केली.