अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोरोनामुळे स्थगित झालेली खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक १३ फेबु्रवारी रोजी होणार आहे.
मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यामुळे सर्व निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. यात अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचाही समावेश होता. मात्र आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार मतदानाची तारीख जाहीर झाली आहे. मंडळासाठी १३ फेब्रुवारीला मतदान तर १४ रोजी मतमोजणी होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे पत्र, अध्यक्ष अनिल कदम यांनी निवडणूक समितीला दिले आहे. खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक विश्वस्त व आठ कार्यकारी मंडळ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत एकूण ५ हजार ७८६ मतदार हक्क बजावणार असून यात कार्यकारी संचालक पदासाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. कार्यकारी संचालक पदासाठी आशीर्वाद पॅनलमधून नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, डॉ.संदेश गुजराथी, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, डॉ.अनिल शिंदे, गुलाबराव पाटील व हरी वाणी हे रिंगणात आहेत. तर सहकार पॅनलमधून माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भरत कोठारी, हेमंत पवार, प्रभाकर कोठावदे, प्रसाद शर्मा, प्रवीण जैन, कल्याण पाटील आदी उमेदवार रिंगणात आहेत.