विधिमंडळात शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार अनिल पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेतल्याने त्यांचा अमळनेर येथे रेल्वे स्थानकावरच सत्कार करण्यात आला.

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकर्‍यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर गाजत असताना अधिवेशनाचे पाहिले सेशन आटोपून अमळनेरात परतलेल्या आमदार पाटील यांचा मोठा सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला.

मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी बांधवानी सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशन गाठून आमदार अनिल पाटील रेल्वे तुन उतरताच त्यांचा सत्कार केला.शेकडोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहून आमदारही भारावले होते. सदर सत्काराला त्यांनी विरोध केला असता कुणीही एकूण न घेता त्यांच्या गळ्यात पुष्पहारांचा पाऊस पाडला.

खरे भूमिपुत्र आमदार-प्रा सुभाष पाटील

कॉंगेस किसान सभेचे अध्यक्ष प्रा सुभाष पाटील म्हणाले की आमचे खरे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांनी विधिमंडळात सरकारला जागे करून कापसाची दखल घ्यायला भाग पाडले. यामुळे आमच्या आमदारांचा अभिमान आम्हाला असून त्यांनी विधिमंडळात आंदोलन करीत जे कष्ट घेतले त्याबद्दल हा सत्कार आम्ही केला असून असेच शेतकर्‍यांचे विषय ते यापुढेही मांडत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक अधिवेशनात अमळनेरचा आवाज-सचिन पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी प्रत्येक अधिवेशनात आपले भूमीपूत्र आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने अमळनेर चा आवाज गरजत असून त्यांच्या विविध आंदोलनामुळे सरकारला त्यांची चांगलीच धडकी भरली असल्याची भावना व्यक्त केली.

सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन-आ अनिल पाटील

आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की अधिवेशनात महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा होउन कापूस, कांदा व इतर धान खरेदी याकडे हे सरकार ठरवून लक्ष देत नसल्याने आम्ही सरकारला बोलते करण्याचा प्रयत्न केला,मी स्वतः आपल्याकडे कापसाची जी परिस्थिती झाली आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला,यामुळे सरकार मधील प्रतिनिधी बोलते झाले आता येणार्‍या काळात कापूस, कांदा, सोयाबीन,धान व सिंचन क्षमता यावरच आम्ही बोलणार असून पाडळसरे धरणाला महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने चांगला निधी दिला त्याच पद्धतीने या सरकारने देखील द्यावा अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

या प्रसंगी पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, विकासो चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकी संघ आदी सर्व आजी, माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content