बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी | एकीकडे चाळीसगावात काल पावसाने हाहाकार उडाला असतांना दुसरीकडे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने बोरी मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे नदीच्या काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने बोरी धरण हे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असल्याची माहिती दिली होते. काल सकाळी धरण पूर्ण भरल्याने याचे पहिल्यांदा पाच दरवाजे उघडण्यात आले होेते. तर आज सकाळपासून धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

या धरणाचे पंधरा दरवाजे हे ०.१५ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणाच्या खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. परिणामी खालील बाजूस असणार्‍या गावांमध्ये राहणार्‍या ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी. नदीच्या पाण्यात उतरू नये, तसेच गुरा-ढोरांना पाण्यासाठी नदीत उतारू नयेत अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील तहसीलदारांनी केले आहे.

Protected Content