श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाच्या सन २००६च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात एकूण ४५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी आपला परिचय देत वर्गातील गमतीजमती, सुख-दुःखाचे प्रसंग सांगितले.

बोराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे संचालक सुपडू संदानशिव यांनी आपल्या या छोट्याशा गावामध्ये गोरगरिबांचे शिक्षण व्हावे यासाठी श्री वासुदेवबाबांनी उभारलेल्या शाळेचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतुक करत, या शाळेमुळे आपण घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नाशिक येथील भाग्यश्री नेवे यांनी १९९२ सालापासून शाळा सुरू झाल्यामुळे गावातील मुलींना शिक्षण घेता आल्याचे सांगितले. गावातील प्रगतीशील शेतकरी जितेंद्र धनगर यांनीही वासुदेवबाबांच्या योगदानामुळे गावाच्या आणि वंचित घटकांच्या शिक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे कौतुक केले. वस्तीगृहातील माजी विद्यार्थी कैलास सोनवणे यांनी आपल्या अनुभवातून वस्तीगृहामुळे शिक्षण पूर्ण करता आल्याचे सांगितले. त्यामुळे आज ते स्वतःच्या पायावर उभे असून चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह संभाजीनगर, सुरत, नाशिक, मुंबई, रत्नागिरी आणि मध्य प्रदेश या ठिकाणांहून माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांमधून युवराज पाटील, प्रशांत सोनवणे, संजय गोसावी आणि सुधीर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य व्हि. जी. तेली यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री नेवे यांनी केले. सूत्रसंचालन सुपडू संदानशिव यांनी तर आभार प्रदर्शन लता मनोरे यांनी केले.

कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षक एम. पी. पाटील यांच्याकडून हजेरी घेण्याचा आग्रह धरला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेंद्र धनगर, स्वप्निल कोळी, महेश पाटील, कैलास सोनवणे, सुनील पाटील, राजू तडवी, हमजान तडवी, सतीश पाटील, राजा तडवी, गीता राजपूत, लता मनोरे, सोनाली राजपूत, उषा तडवी, राधा राजपूत, जायदा तडवी, मिथुन गजरे, माधुरी राजपूत, अब्दुल तडवी, जागृती पाटील, फकिरा तडवी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याच्या निमित्ताने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनी शालेय उपयोगी वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्याचे किट वाटप केले.

Protected Content