जळगाव प्रतिनिधी । पैसे देण्याचे आमिष दाखवत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जामनेर पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली अटक केलेल्या आरोपीला येथील सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश ढुबे यांनी चार वर्षाचा कारावास आणि 6 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सप्टेंबर 2015 ही घटना जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात घडली होती.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी 25 सप्टेंबर 2015 रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत जात असतांना गावातीलच आरोपी गणपत श्रावण सोनवणे (वय-55) यांने पिडीत मुलीला जवळ बोलावून ‘घरातील भांडे धुवून दे मी तुला पैसे देतो’ असे सांगून घराचा कडी कोयंडा आतून लावून घेतले होते. याबाबत पिडीत मुलीच्या आजीला माहिती मिळाल्यानंतर आजीने आरोपीच्या घराकडे धाव घेतली. यावेळी पिडीत मुलगी पलंगाखाली विवस्त्र आवस्थेत आढळून आली. गर्दी पाहताच आरोपी गणपत सोनवणे फरार झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलीसात आरोपी गणपत सोनवणे यांच्या विरोधात अत्याचार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार यांनी दोषारोपत्र दाखल केले असता सात साक्षिदार तपासण्यात आले असून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.जी.ढुबे यांनी आरोपी गणपत सोनवणे याला दोषी ठरवत 354 (ब) अंतर्गत 4 वर्ष आणि 5 हजार रूपये दंड आणि भादवी 342 अंतर्गत 6 महिने शिक्षा आणि लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत 4 वर्षे आणि 1 हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. शिला गोडांबे यांनी कामकाज पाहिले.