जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यासाठी 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची मुंबई येथे स्थापना केलेली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कल्याणकारी लाभांचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते 25 ऑगस्ट वाटप होणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे 12 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आलेली असून विशेष नोंदणी अभियांतर्गत सुमारे 5 हजार नोंदणी अपेक्षित आहे. मंडळामधील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप करण्यात येते. अवजारे खरेदी व शिष्यवृत्तीसह सुमारे 1 कोटी इतक्या रकमेच्या वाटप करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. अत्यावश्यक व सुरक्षा संच तसेच विविध कल्याणकारी योजनेंच्या लाभाचे वाटपाचा शुभारंभ 25 ऑगस्ट, 2019 रोजी स्वर्गीय इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर येथे सायंकाळी 5 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, कामगारमंत्री डॉ.संजय कुटे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. याप्रसंगी जिल्हयातील खासदार, आमदार, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नोंदित बांधकाम कामगारांनी 25 ऑगस्ट रोजी जामनेर येथील कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून विविध कल्याणकारी लाभांच्या वाटपाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.