
धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमरावती महानगरपालिकेतील आमसभेत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी सफाई कर्मचाऱ्यांबाबत कथितरीत्या वापरलेल्या अर्वाच्च भाषेविरोधात भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात धरणगाव येथील इंटक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून देशमुख यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेदरम्यान नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी आपल्या प्रभागातील समस्यांवर बोलताना लोकशाहीच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी कथितपणे असे वक्तव्य केले की, “आमच्या वॉर्डात सफाई कर्मचारी आले, तर त्यांना उलटा लटकावून मारू.” अशा प्रकारचे विधान हे अत्यंत बेजबाबदार आणि असंसदीय असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
एका लोकप्रतिनिधीकडून सार्वजनिक सभागृहात कर्मचाऱ्यांना मारहाणीची धमकी देणे आणि त्यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे ही गंभीर बाब असल्याचे इंटकच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. या विधानामुळे संपूर्ण सफाई कर्मचारी वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या असून कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचारी कार्यरत असल्याने अशा प्रकारची धमकी आणि अपमानास्पद भाषा वापरणे हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरू शकतो, असा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कायद्यांतर्गत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
इंटक संघटनेचे अध्यक्ष चेतन कन्हैय्या वाघरे यांनी दिलेल्या निवेदनात प्रशासनाचे कर्तव्य सभागृहाचे पावित्र्य राखणे आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे हे असल्याचे नमूद केले आहे. अशा चिथावणीखोर विधानांमुळे कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
संघटनेने आपल्या मागण्यांमध्ये नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी अॅक्ट तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांनी केलेल्या कथित असंसदीय विधानाबद्दल त्यांचे महानगरपालिकेचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, जळगाव यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे इंटक संघटनेने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



