मुंबई प्रतिनिधी । आजच्या घडामोडीनंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना आमदारांच्या फुटीची धास्ती वाटत असून यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील मोठा गट जाण्याची शक्यता सकाळपासून वर्तविण्यात येत आहे. तथापि, दुपारी हाती आलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबतचे बरेच आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे आल्यामुळे या पक्षात तूर्तास मोठी फुट नसल्याचे दिसून आले. तथापि, येत्या काही दिवसांत हे चित्र बदलू शकते. तर सत्ता गेल्यामुळे नाराज असणार्या शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतुष्ट हे भाजपच्या गळास लागण्याची शक्यता आहे. यामुळे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता सावध पावले उचलण्यास प्रारंभ केला असून आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला असल्याने आपले आमदार न फुटू देण्याची काळजी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे.