अकोला (प्रतिनिधी) भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असून येत्या 15 तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे.
लातूरचे अण्णाराव पाटील, साताऱ्याचे लक्ष्मण माने हे काँग्रेसशी आघाडीसंदर्भात चर्चा करत होते. 22 जागी आम्ही उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेस पक्षाला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला. परंतु तो काँग्रेसने स्वीकारला नाही. ज्या 22 जागी उमेदवार दिले आहेत, ते माघार घेणार नसल्याचे काँग्रेसला सांगितले होते. काँग्रेसने ते उमेदवार स्वीकारावेत किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी काँग्रेसने आपला एबी फॉर्म लावावा, अशी ऑफर आम्ही काँग्रेस पक्षाला दिली होती. काँग्रेस आमचे 22 उमेदवार स्वीकारण्यास तयार नाही. काँग्रेसकडून होकार न आल्याने या चर्चा पुढे जातील, असे वाटत नाही. त्यामुळे उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.