मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतातील सर्व व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागणार आहे. शाळांना उन्हाळी सुट्या असल्या तरी भारतातील व्याघ्रप्रकल्प, अभयारण्यांना मात्र पावसाळी सुट्या लागतात. येत्या एक जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून पर्यटनाचे प्रवेशद्वार बंद होणार आहेत. मात्र, या सुट्या व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या कोअर म्हणजेच गाभा क्षेत्राला असून बहुतांश ठिकाणी बफक्षेत्र पर्यटनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सफारी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना तीन महिने जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. जंगल पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हा निर्णय वन विभागाकडून दरवर्षी घेण्यात येतो. हे रस्ते कच्चे आणि मातीचे आहेत. पावसाळ्यात खूप चिखल होतो. त्यामुळे जीप व इतर वाहने अडकून पर्यटकांना त्रास व असुरक्षित परिस्थिती निर्माण होते. तसेच पावसाळा हा वन्यजीव, पक्षी, कीटक यांच्या मिलनाचा देखील काळ असतो.