मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकाळातील सर्व निर्णय रद्द करून शिंदे सरकारने अजून एक तडाखा दिला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, मविआ सरकारमधील अनेक निर्णय शिंदे यांच्या सरकारने फिरवले आहेत. यात आता अजून एका खात्याची भर पडली आहे. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या काळात घेण्यात आलेले म्हाडा संदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गृहनिर्माण विभागाशी संबंधित सर्व निर्णय म्हाडा आणि विभागीय मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल उशीरा याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे येथून पुढे सर्व अधिकार म्हाडा तसेच विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडाला यापुढे कोणताही निर्णय घेताना सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही. आव्हाडांच्या काळात एखाद्या निर्णयासाठी म्हडाला सरकारच्या परवानगीची वाट पहावी लागत होती. मात्र, आता सर्व निर्णय घेण्याची मुभा म्हाडा तसेच विभागीय मंडळांना देण्यात आली आहे.