इंदूर वृत्तसंस्था । भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला इंदूरच्या मैदानात सुरुवात झाली आहे. भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे सुरुवातीपासूच चाचपडणाऱ्या बांगलादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर माघारी परतला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला आहे. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाहुण्या संघाला अवघ्या ५८.३ षटकांत गुंडाळले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशच्या डावाची सुरुवातच अडखळत झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी सहा धावा काढून तंबूत परतले. कर्णधार मोमीनूल हक आणि मुशफिकूर रहीम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची झुंज अपेशी ठरली. हक ३७ धावांवर तंबूत परतला तर, मुशफिकूरला मोहम्मद शमीने ४३ धावांवर टिपले. अन्य फलंदाजही ठराविक अंतरानं बाद होत गेले. मधल्या फळीतील मोहम्मद मिथुन यानं १३, महमुदुल्लाहनं १० तर लितॉन दास यानं २१ धावा केल्या. बांगलादेशचा एकही फलंदाज ५० धावांपर्यंत मजल मारू शकला नाही. विशेष म्हणजे, तब्बल सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही उभारता आली नाही.
भारताकडून मोहम्मद शमी यानं तीन गडी बाद केले. इशांत शर्मा, उमेश यादव व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर, एक जण धावबाद झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघानं आतापर्यंत दोन मालिका खेळल्या आहेत. भारतानं वेस्ट इंडिजला २-० ने तर दक्षिण आफ्रिकेला ३-० ने धूळ चारली आहे.