मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे काम अत्यंत संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आणि ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.
मंत्री महाजन यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विविध यंत्रणांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतांनुसार, कामे तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी निविदा प्रक्रिया जलदगतीने राबवून मंजूर कामांना गती द्यावी. शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी विहित कालावधीत खर्च होईल, याची दक्षता घेऊन अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सूचित केले.

यासोबतच, आपत्ती व्यवस्थापन विभागाने ग्रामीण भागात पुरवलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर होण्यासाठी ग्रामपातळीवर जनजागृती करण्याची गरज श्री. महाजन यांनी व्यक्त केली. ग्रामस्थांना या साहित्याचा वापर कसा करावा, याबाबत प्रशिक्षण देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः, महाविद्यालयीन तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना या कार्यात सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.
या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, जलसंपदा विभागाचे सहसचिव रा.अ. काटपल्लीवार, मृदू व जलसंधारण विभागाचे सहसचिव वी. म. देवराज, महावितरणचे कार्यकारी संचालक द. वी. पडळकर, खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता वी.पा. पाटील, वित्तीय सल्लागार व सहसचिव अरुण कोल्हे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव द. ह. कदम, आपत्ती व्यवस्थापनाचे अवर सचिव रतनसिंह परदेशी, राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, नगरविकास विभागाच्या नम्रता मुंदडा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विविध यंत्रणांचे क्षेत्रीय कार्यालय प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.



