पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ‘असा कर्मयोग सांगणारे संत शिरोमणी सावता महाराज आणि ‘नाचू कीर्तनाचे रंगी , ज्ञानदीप लावू जगी ‘ असे लोक शिक्षणाचे भक्तीकार्य करणारे राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पहूर नगरीत उद्या शनिवार , दिनांक २७जुलै २०२४ रोजी क्षत्रिय माळी समाज संघटनेचे सचिव ह भ प विकास आनंदा उबाळे यांच्या हस्ते कलश पूजनाने सकाळी ८ वाजता रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास प्रारंभ होत आहे.
क्षत्रिय माळी समाज संघटना संचलित महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या मंगल वास्तुमध्ये होवू घातलेल्या या संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी प्रित्यर्थ अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची मुहूर्तमेढ गेल्या २४ वर्षांपूर्वी स्वर्गीय ह भ प जनार्दन स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने स्वर्गीय हभप शंकर महाराज भिवसने यांनी रोवली . ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी । तयाचा वेलू गेला गगनावरी ‘ या संत उक्ती प्रमाणे आज तागायत हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह अखंडित सुरू असून यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे.
रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे औचित्य साधून राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांची , प्रबोधनकारांची कीर्तनमाला गुंफली जाणार असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाची मेजवानीच भाविकांना मिळणार आहे.
असे आहे दैनंदिन नियोजन
सकाळी ५ ते ६काकडा आरती .
दुपारी ११ ते ४ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ
रात्री ८ – ३० ते १० – ३० हरी किर्तन
असे आहेत कीर्तन- उद्या शनिवारी २७ जुलै रोजी ह भ प अमोल महाराज घुगे आळंदीकर, रविवारी २८ रोजी ह भ प दीनानाथ महाराज सावंत आळंदीकर, सोमवार २९ रोजी ह भ प भरत महाराज म्हैसवाडी आळंदी, मंगळवारी ३० रोजी ह भ प मच्छिंद्र महाराज वाडी भोकर, बुधवारी ३१ रोजी ह भ प पारस महाराज बनोटीकर, गुरुवारी १ ऑगस्ट रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज धरणगांव पाळधी, शुक्रवार २ऑगस्ट रोजी ह भ प गोविंद महाराज केकत निंभोरेकर यांचे दररोज रात्री साडेआठ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान हरी किर्तन होणार असून शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ह भ प लक्ष्मण शास्त्री महाराज आळंदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने रौप्य महोत्सवी सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून समारोपाला सायंकाळी ५ वाजता गावातून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . ह भ प मुकुंदा महाराज पहुरकर हे व्यासपीठाचे नेतृत्व करणार असून समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि क्षत्रिय माळी समाज संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच विविध संस्थांचे सन्माननीय पदाधिकारी, भजनी मंडळ, ग्रामस्थ यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .