जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी उल्का पडल्यासारख्या तेज शलाकाचं दृश्य पाहायला मिळालं त्यामुळे ते नेमकं उल्का पिंड आहे की सॅटॅलाइटचे तुकडे होऊन तो विखुरला आहे. यासंदर्भात खगोलप्रेमींसह नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे.
यासंदर्भात मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे, खगोल शास्त्रज्ञ प्रा. दिलीप भारंबे यांच्याशी संपर्क साधून आम्ही माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी “आकाश घटनेमध्ये अनेक प्रकारचे सॅटॅलाइट हे भटकत असतात. आकाशात इतकी गर्दी झालीय. सॅटॅलाइटचं ट्राफिक जाम होतं आणि मग एखादा सॅटेलाइट भरकटून कक्षेच्या बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यामुळे तो तुटत जातो. तापतो आणि खाली येता येता त्याचे तुकडे होतात. तर असंच एखादा लहानसा सॅटॅलाइट विख्ररून त्याचे तुकडे पडलेले असू शकतात किंवा चुकून एखादा लहान उल्का पिंडदेखील असण्याची शक्यता त्यांनी प्रथमदर्शनी व्यक्त केली.”
इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचेच तुकडे
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी, “न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत… आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत” असं मत व्यक्त केलं.