आकाश धनगर यांची रेडक्रॉसमध्ये सहयोगी सदस्य म्हणून नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अनुभूती स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि सामाजिक कार्यकर्ते आकाश अशोक धनगर यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेवर सहयोगी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही नियुक्ती केली आहे.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेवर आगामी ३ वर्षांसाठी ६३ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन भवनात झालेल्या पदग्रहण समारंभात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते आकाश धनगर यांना रेडक्रॉसचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनी मेमन, डॉ. प्रसन्नकुमार रेदासणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रेडक्रॉस ही जगातील १८७ देशांमध्ये ७० लाख स्वयंसेवकांच्या मदतीने अखंडपणे सेवा देणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सर हेन्री ड्युनांट यांनी मानवतावादी सेवाभावी दृष्टीकोनातून संस्थेची स्थापना केली होती. भारतात दिल्ली येथे १९२० साली स्थापना झाली. रेडक्रॉस संस्थेचे दिल्ली राष्ट्रीय पातळीवर महामहीम राष्ट्रपती, राज्य पातळीवर महाराष्ट्राचे राज्यपाल, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
रेडक्रॉस सोसायटी मार्फत गरजूंना २४ तास रक्तसेवा उपलब्ध असते. तसेच कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केंद्र, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ई सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना, पर्यावरण व वृक्षारोपण संवर्धन असे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात. या प्रतिष्ठित संस्थेच्या जळगाव जिल्हा शाखेवर आकाश धनगर यांची निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Protected Content