मुंबई-वृत्तसेवा । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेबाबत आता नवे राजकीय वादळ उठले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा केवळ अपघात नसून नियोजित घातपात असू शकतो, असा गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक तांत्रिक आणि संशयास्पद बाबी मांडत सखोल चौकशीची मागणी केली.
मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक नियंत्रण गमावले आणि एका बाजूला झुकत जमिनीवर कोसळले. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करताना काही बाबी संशयास्पद वाटल्या. विमान धावपट्टीवर न पडता बाजूच्या कठीण पृष्ठभागावर आदळल्यामुळे धक्क्याची तीव्रता वाढली, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विमानातील इंधन टाक्या नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मुंबई ते बारामती हा अल्प अंतराचा प्रवास असताना टाक्या पूर्ण क्षमतेने का भरल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, जर पुढील प्रवासासाठी इंधन भरले गेले असेल, तर ते बारामतीऐवजी इतरत्र भरता आले असते. जादा इंधन असल्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या सर्व बाबी लक्षात घेता पायलटच्या भूमिकेसह संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार यांनी VSR कंपनीवरही गंभीर आरोप करत विमानाची नोंदणी बेकायदेशीर असल्याचा दावा केला. या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी काही ट्रोलर्स भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला. भाजपशी संबंधित काही सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे त्यांच्यावर टीका केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, दुर्घटनेच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल, असा संदेश काही सोशल मीडिया खात्यांवरून टाकण्यात आला होता आणि नंतर तो हटवण्यात आला. याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच विमानतळ प्राधिकरणाला दिलेली गोपनीय माहिती बाहेर कशी जाते, यावरूनही त्यांनी संशय व्यक्त केला.
डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनमधील एका अधिकाऱ्याचा उल्लेख करत त्यांनी काही संपर्कांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. VSR कंपनीचा मालक आणि काही राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. “तुमच्याकडे पैसेवाले लोक असतील, पण आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत,” असे आव्हानही त्यांनी दिले.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात आधीच भावनिक वातावरण असताना आता घातपाताच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, तपासातून नेमके काय सत्य समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



