इंदापूर, वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने सध्या सर्वच पक्षाचे नेते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकाच दिवसात अनेक ठिकाणी सभा घेत नेते धावपळ करत आहेत. पण अशावेळी पक्षाचा नेता समोर असल्याने स्थानिक नेत्यांना आपला उत्साह आवरत नाही. मग याच उत्साहात नेत्यांसमोर भाषणे करण्यासाठी प्रत्येकजण पुढे येण्याचा प्रयत्न करतो. अशाच उत्साही नेत्यांवर चिडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट सभा सोडून जाण्याची धमकी दिली. इंदापूरमधील सभेत हा प्रकार घडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असणारे अजित पवार इंदापूरमधील बावडा येथील प्रचासभेसाठी उपस्थित होते. ही सभा संपल्यानंतर अजित पवारांनी पुढील सभेत जायचे होते. मात्र यावेळी इतर नेत्यांची भाषणे इतकी लांबायला लांगली की, अजित पवारांना राग अनावर झाला. आपल्याला पुढील सभांना जाण्यासाठी उशीर होत असल्याने त्यांनी थेट माइक हातात घेतला आणि निवेदकालाच सुनावले.
अजित पवार यां नी आपला संताप व्यक्त करताना म्हटलं की, “मला चार सभा आहेत. काय चेष्टा लावली आहे माझी. काल बार्शीत मला रात्री १०.०० वाजता पावसात शेवटची सभा करावी लागली. असं करु नका. माझ्याआधी काय बोलायचे ते सगळ्यांनी बोला ना…नाही तर एक काम करा. मी जातो निघून तुम्ही भाषणं करत बसा, माझं काही म्हणणं नाही”.अजित पवार चिडलेले पाहून निवेदकानेही आवरतं घेतलं आणि उमेदवार दत्तात्रय भरणे यांना भाषणासाठी बोलावले. अजित पवारांचा हा राग त्यांचं भाषण सुरु होण्याआधीही पहायला मिळाला. निवेदक बोलत असताना ‘तू जरा शांत बस’ अशा शब्दांत त्यांनी त्याला खडसावले.