मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळाले असून आता अजित पवार हे पक्षातून वेगळी चूल मांडण्याची शक्यता बळावली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थता सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आले. तर, त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवे अशी देखील माहिती समोर आली होती. या अनुषंगाने आज अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षातील त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक झाली.
या बैठकीत दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदी ज्येष्ठ नेत्यांसोबत पक्षाचे सुमारे २० आमदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत चर्चा सुरू असून यात अजितदादा समर्थकांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा केली. याबाबत अद्याप निर्णय ठरला नसला तरी येत्या काही तासांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी याबाबत घडामोडी होतील असे मानले जात आहे.