पुणे प्रतिनिधी । माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार असल्याचे शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यामुळे त्यांनी राजकीय संन्यास घेतला का ? या चर्चेलाही उधाण आले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजीनामा देऊन ते नॉट रिचेबल झाल्यानंतर या प्रकरणाचे गुढ वाढले. यानंतर रात्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यानुसार शरद पवार यांनादेखील माहिती न देता, अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत अजित पवार यांच्या कुटुंबाशी बोलणे झाल्यानंतर शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि त्यात शरद पवार यांचे नाव झाल्यामुळे हा राजीनामा देण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. त्यांनी आपल्या मुलांशी बोलतांना राजकारणापेक्षा शेती वा व्यवसाय हा चांगला असल्याचे सांगितले. तर यापुढे राजकारण सोडून शेती करणार असल्याचेही अजित पवार यांनी आपल्या मुलांना सांगितले. यामुळे आता ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर असतील हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या माध्यमातून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेतदेखील दिले आहेत.