मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ हे अजित पवारांचे असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला आहे. शरद पवारांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र त्याआधीच अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी अजित पवार गटाला देखील मिळावी. सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून दोन गटात वाद सरू आहे. या वादावर सुनावणी घेत निवडणूक आयोगाने अजित पवार गट खरी राष्ट्रवादी असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह देखील अजित पवार यांना देण्यात आलं आहे.