मुंबई । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आधी कार्यकारिणीच्या सदस्यांनीच राजीनामा देण्याची मागणी माजी खासदार संजय निरूपम यांनी केले आहे. राहूल यांनी पक्षाची धरा सांभाळण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीआधी काँग्रेसमधे मते-मतांतरे व्यक्त करण्यात येत आहेत. यात आता मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार संजय निरूपम यांनी उडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेले पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच हे पत्र माध्यमांत झळकल्याने पक्षातील नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षाची पुढील वाटचाल आणि नेतृत्वाबाबत काही दिवसांपूर्वी हे पत्र लिहिले होते. निरुपम यांनी या प्रकारावर टीका केली आहे. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत बंद खोलीत जी षडयंत्रे रचली जात होती, ती या पत्राच्या रूपाने समोर आली. याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारणार नसल्याचा हट्ट सोडून द्यावा, नेतृत्व हाती घ्यावे व पक्षाची पडझड थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधीच काँग्रेसला वाचवू शकतात, असे निरुपम म्हणाले.