मुंबई-वृत्तसेवा । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार करण्यात आलेल्या कंटेंटवर आता स्पष्ट लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच डीपफेक व्हिडिओ किंवा फोटो आढळल्यास ते तीन तासांच्या आत हटवण्याचे निर्देश सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात आदेश जारी केले. IT नियम 2021 मध्ये बदल करण्यात आले असून हे नवे नियम 20 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. या बदलांचा मसुदा 22 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

नवीन नियमांनुसार, X (ट्विटर), यूट्यूब, फेसबुक, स्नॅपचॅटसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर AI द्वारे तयार करण्यात आलेल्या प्रत्येक ऑडिओ व व्हिडिओ कंटेंटवर ठळक लेबल लावणे आवश्यक राहणार आहे. या लेबलमध्ये संबंधित कंटेंट खरा नसून AI द्वारे तयार करण्यात आला आहे, असे स्पष्ट नमूद करावे लागेल. तसेच प्रत्येक AI कंटेंटमध्ये कायमस्वरूपी मेटाडेटा किंवा ओळखकर्ता एम्बेड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
व्हिडिओ कंटेंटमध्ये हे लेबल किमान 10 टक्के भागात दिसणे आवश्यक असून ऑडिओ कंटेंटमध्ये पहिल्या 10 टक्के वेळेत ते ऐकू येणे बंधनकारक राहील. एकदा लावलेले लेबल किंवा मेटाडेटा काढणे, बदलणे किंवा लपवणे शक्य राहणार नाही.
याशिवाय अश्लील, फसवणूक करणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या AI कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना ऑटोमेटेड टूल्सचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दर तीन महिन्यांनी किमान एकदा वापरकर्त्यांना नियमांबाबत चेतावणी देणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे. नियमांचा भंग केल्यास दंड अथवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले की, जनरेटिव्ह AI मुळे वाढणारी गैरमाहिती, तोतयागिरी आणि निवडणूक प्रक्रियेत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले असून यामुळे सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार इंटरनेट निर्माण होईल.



