जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील धाडीचा संशयकल्लोळ मिटत नाही, तोच चोपडा एसडीपीओ कार्यालयातील पथकाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. डीवायएसपी सौरभ अग्रवाल हे अक्षयतृतीयेच्या दिवशी सुटीवर जाताच काही कर्मचाऱ्यांनी रात्रीतून पाच ठिकाणी धाडी टाकल्या. परंतु गुन्हा एकही दाखल केला नाही. तर जुगार अड्ड्यावर जप्त केलेली सर्व रक्कम नेहमी प्रमाणे लंपास करण्यात आल्याचा आरोप धरणगाव प्रमाणे चोपड्यातही होतोय. चोपडा येथील एका नगरसेवकाकडे टाकलेल्या धाडीत तोडपाणी झाल्याची जोरदार चर्चा सुरुय. विशेष म्हणजे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या कार्यालयात फोन लावून काही जणांनी नाव न छापण्याच्या अटीवर याबाबत हकीगत सांगितलीय. एवढेच नव्हे तर, आम्ही खोटं बोलत असू तर साहेबांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल लोकेशन चेक करावे,असे देखील त्यांनी सांगितले.
धरणगाव शहरातील धाडीत लाखो रुपये गायब केल्याचा आरोपाचा धुराळा खाली बसत नाही तोच आता चोपडा एसडीपीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा नवीन प्रताप समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार डीवायएसपी सौरभ अग्रवाल हे अक्षयतृतीयेच्या दिवसा पासून नऊ दिवस सुटीवर गेले आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत एक अधिकारी, चार कर्मचारी आणि एका झिरो पोलिसाने अक्षयतृतीयेच्या रात्री चोपडा शहर व तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. अक्षयतृतीयेच्या रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे ३.३० वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता.
चोपड्यात नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर छापा आणि तोडपाणी
शहरातील एका विद्यमान नगरसेवकाच्या मल्हारपुरा भागातील खाजगी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये वरच्या मजल्यावर स्वतः नगरसेवक व त्यांच्या सोबत असलेले १० ते १२ लोकं हे दि.७ रोजी जुगार खेळत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित पुलाजवळील कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कमसह मुद्देमाल मिळून आला. मात्र, एवढे असतांनाही गुन्हा दाखल का करण्यात आला नाही?, हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे गावात कुठं किती मोठा गेम बसलाय याची झाडाझडती आधीच झिरो पोलीस करून आलेला होता. त्यामुळे धाडी टाकतांना कर्मचाऱ्यांना मोठा ‘परमानंद’ मिळत होता. कारण त्यांच्या डोक्यावर हात असणाऱ्याच्या ‘बावीस’ करा‘मती अद्याप पूर्ण झालेल्या नाहीय. थोडक्यात ‘शिवाजी’ – द बॉस या चित्रपटाप्रमाणे तसचं मथुरेतल्या प्रकाश प्रमाणे रात्रभर सर्व पैशांची हिस्सेवाटणी सुरु होती. मल्हारपूरा भागातील धाडीत २५ हजार मिळाले अशी चर्चा आहे. गुन्हा दाखल केला नाही तर, काय करून घेतील ‘लोकं रे’…असं देखील एक अधिकारी म्हणत होता,अशी देखील चर्चा आहे.
दि.७ रोजी अक्षय तृतीया निमित्त साधून रात्रीच्या ११ ते १२ वाजेच्या सुमारास शहरातील एका पुलाजवळ विद्यमान नगरसेवकाच्या खाजगी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नगरसेवक, डॉक्टर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक जुगार खेळत होते. तर पोलीस विभागाचे अधिकारी यांनी या नगरसेवकांकडून तोडपाणी करून गुन्हा दाखल न करताच त्या सगळ्या जुआरींना कारवाई न करताच सोडुन दिल्याची चर्चा वजा आरोप सुरु आहे. याबाबत काही जागृत नागरिकांनी याविषयी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता दि.७ रोजी असा काही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले, असे देखील कळते. मग हे कारवाई करणारे कर्मचारी व अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जाऊ द्या ना साहेब अन् १५ हजार हातात
पहिल्या दोन ठिकाणी मोठी शाळा भरल्यानंतर या पथकाचा मोर्चा मेघुराया चौक या भागात वळला. येथे देखील मोठ्या प्रमाणात जुगार सुरु होता. पोलीस आल्यानंतर थोडा वेळ गोंधळ उडाला. त्यानंतर मात्र, जुगार चालविणाऱ्याने ‘साहेब जाऊ द्या’, म्हणत १५ हजार हातात ठेवले. येथे देखील कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही.
महात्मा फुले नगरात २८ हजार रुपये
नगरसेवकाच्या खाजगी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील, मल्हारपुरा आणि मेघुसराया भागानंतर पथकाचा मोर्चा महात्मा फुले नगरकडे वळला. याठिकाणी जवळपास २८ हजार रुपये जुगाऱ्यांकडून जप्त करण्यात आले. अर्थात येथेही कुणालाही ताब्यात घेण्यात आली नाही. त्यामुळे गुन्हा तर फारच लांब राहिला. परंतू पैसे घेवून गेल्यामुळे अनेक जुगारी कुर-कुर करत होते.
हातेडला सर्वात मोठी तोडपाणी
शहरात तीन ठिकाणी धाडीच्या नावाखाली खिसे भरण्याचे काम झाले. त्यानंतर मात्र, या पथकाने ग्रामीण भागात मोर्चा वळविला. हातेडला गेल्यावर ही धाड नुसती पोलिसांची नाही तर,अग्रवाल साहेबांची आहे,असं भासविण्यात आले. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून याठिकाणी ५५ हजार रुपये मिळाले. त्यामुळे येथेही कुठलीही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
अडावदला धाडसत्राचा समारोप
मध्यरात्री तीन ते साडे तीनच्या सुमारास काही कर्मचारी अडावदला पोहचले. जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर त्यांनी थेट अग्रवाल साहेबांची धाड असून साहेब गाडीत बसले असल्याची थाप मारली. त्यामुळे धास्तावल्या जुगाऱ्यांनी पटापट पैसे काढून देवून टाकले. याठिकाणी थेट चक्क अग्रवाल साहेबांचे नाव वापरण्यात आले. तसंही अग्रवाल साहेबांचे पथक असल्यामुळे बहुतांश ठिकाणी जुगाऱ्यांनी पैसे देऊन सुटका करून घेण्यातच धन्यता मानली.
डॅशिंग आणि प्रामाणिक अधिकारीच्या प्रतिमेचा दुरुपयोग
अवघ्या काही दिवसातच चोपडा विभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी एक प्रामाणिक,निर्भीड आणि डॅशिंग अधिकारी म्हणून आपली एका चांगली प्रतिमा तयार केलेली आहे. परंतु काही जण याच प्रतिमेचा दुरुउपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. त्यात प्रामुख्याने ‘बावीस करा’मतीला एक कर्मचारी आहे. तर ‘राज पुत्र’ आणि मोठ्या संतोषाने ‘पार धी’रज राखणारा दोन अन्य आहेत. परंतु ‘बावीस करा’मती करणारच कर्मचारी या सर्व गोष्टींना फूस देत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे एक झिरो पोलीस त्यांना खास परमानंद देणारा खास पंटर असल्याचे कळते. तर सूर गवसला तर मग नोर आणि मोर सारखेच असतात, हे देखील तेवढेच खरे आहे. अग्रवाल साहेब कायद्याचे भोक्ते आहेत. चुकीच्या गोष्टीला थारा देत नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य गुन्हेगारांना लावणारा निकष ते आपल्या कर्मचाऱ्यांना लावणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.