जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम अद्याप मिळालेला नाही. शिवाय आता केळी उत्पादकांचे प्रस्ताव देखील नाकारण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ठिंबकचे अनुदान तातडीने देण्यात यावे, उडीद मुग सोयाबिन खरीप पिकांना प्रती हेक्टरी ५००० हजार रूपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान योजन शेतकऱ्यांना देण्यात यावे, केळी उत्पादकांना प्रस्ताव केंद्र शासनाने नाकारू नये यासह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी जळगाव ग्रामीण उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख मनीषा पाटील, गुलाबराव कांबळे, किरण पाटील, विनायक धर्माधिकारी, छगन खडसे, हिरालाल कोळी, किरण ठाकूर, रमाकांत कदम, रवींद्र मोरे, प्रकाश सोनवणे, दिलीप सोनवणे, अनिल साळुंखे, विनोद सपकाळे, दीपक कोळी यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.