मुंबई/बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रविकांत तुपकरांनी शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनासाठी जात असतांना मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी अटक केली. रविकात तुपकरांना अटक जरी केली असली तरीही शेतकऱ्यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून आंदोलन केलेच. सध्या रविकांत तुपकरांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन परिसरात ठेवले असून त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी शेतकऱ्यांचा दाबता येणार नाही. काही दिवसात आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी लावकरच रस्त्यावर उतरलेले दिसतील, मग मात्र ते सरकारला जड जाईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० ऑगस्ट रोजी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा” या शासकीय निवासस्थानी ‘शेतकरी आत्महत्या कसे करतात याचे प्रात्यक्षिक दाखवून’ आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. बुलढाणा पोलिसांनी या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता २१ ऑगस्ट रोजी कलम १६८ नुसार रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली होती. परंतु आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली होती. त्यानुसार रविकांत तुपकर पोलिसांना चकमा देत मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो तर पकडले जाऊ त्यामुळे काही कार्यकर्ते व शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील असे नियोजन तुपकारांचे होते. तर दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकमा देऊन ठरलेल्या नियोजनानुसार रविकांत तुपकर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले.
तुपकरांना जरी ताब्यात घेतले तरी शेतकऱ्यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केले, त्यामुळे तणावाचे चित्र निर्माण झाले होते. पोलिसांनी रविकांत तुपकरांना आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे ठेवले असून त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता रविकांत तुपकर यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मला अटक करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. काही दिवसातच आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले दिसतील, मग मात्र ते सरकारला जड जाईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.